Wednesday, May 12, 2010

आव्हानं ‘सीईटी’नंतरची..

एकंदरीत संपूर्ण वर्ष खूप टेन्शनमध्ये घालवल्यावर विद्यार्थी आणि पालक अतिशय निवांत होतात. जणू काही एक शांत झोप घेतात आणि जागे होतात निकालाच्या दिवशी. मान्य आहे की, खूप धावपळीत आणि टेन्शनमध्ये हे वर्ष गेलं. विश्रांती आवश्यक आहे. पण ८-१० दिवस खूप झाले. उरलेल्या एक महिन्यात काय करावे? यासाठी हा लेख.नमस्कार पालक मंडळी आणि माझे अभियंता होऊ इच्छिणारे सीईटी आणि ‘एआयईईई’चे विद्यार्थी,
बारावीची परीक्षा पार पडली आणि एआयईईई, सीईटीसुद्धा. आता वेध लागले आहेत रिझल्टचे. किती मार्क पडतील? मेरिट क्रमांक काय येईल? या वर्षीचे प्रवेशाचे नियम काय असतील? इतरांना कसे मार्क मिळतील? एक ना दोन हजारो प्रश्न पडत असतील. पालकांना चिंता असेल की कुठे प्रवेश मिळेल? या वर्षी फीज् काय असतील? कोणती शाखा निवडावी? चार वर्षांनी त्या शाखेला महत्त्व असेल ना? हे सगळे प्रश्न मनात ठेवून मग आपण जरा माहिती गोळा करायला सुरुवात करतो. पण प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकजण काही वेगळाच सल्ला देतो. कोणी म्हणतं की, पहिल्या फेरीत प्रवेश घ्यायचा नाही. दुसऱ्या फेरीतच चांगले कॉलेज आणि ब्रँच मिळते, तर कोणी म्हणेल की, पहिल्या फेरीत प्रवेश घ्यावा, नंतर काही उरत नाही. परस्परविरोधी सल्ले. त्यात भर म्हणूनच की काय विद्यार्थी अनेक ऐकीव गोष्टी घरी सांगत राहतो. सगळं वातावरण गोंधळाचे होऊ लागते!
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आपल्या सर्वाना या वर्षीच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी माहिती देण्यासाठी हजर आहोत. आपल्यापैकी काहीजणांनी आमचे जुने अंक जपून ठेवले आहेत. कदाचित ते वाचून आपल्याला बरीच कल्पना आली असेल, पण तरीही आम्ही सगळी माहिती प्रवेशप्रक्रिया २०१० साठी देणार आहोत. ही माहिती बऱ्याच प्रमाणात प्रवेशाच्या नियमांवर अवलंबून असते. त्यामुळे मागील वर्षीच्या लेखांपेक्षा या वर्षीच्याच लेखांचा उपयोग करावा.
यावर्षी प्रवेशासंबंधी एक बातमी येऊन गेली ती म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल) याबाबत. यावर्षी त्यांनी असं जाहीर केलं की, जन्माने महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला असणं जरुरी आहे किंवा तो महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असला पाहिजे. ज्यांच्या दाखल्यावर शिक्षणासाठी (एज्युकेशनल परपज) अथवा निवडीनुसार (बाय चॉईस) असा शेरा असेल त्यांना प्रवेश दिला जाणार नाही आणि एकदम एक वादंग सुरू झालं. खरं म्हणजे गेल्या वर्षी जर सलग १५ वर्षे महाराष्ट्रात राहात असल्याचा पुरावा दिला तर डोमिसाईल मिळत असे. या बदलामुळे अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार होता. अखेर नियम बदलला गेला आणि सर्व प्रकारचे रहिवासी दाखले मंजूर करण्यात आले. याचा परिणाम काय होणार? गेल्यावर्षी महाविद्यालयांमध्येच डोमिसाईल मिळण्याची सोय केली होती, तशी यावर्षी का नाही? असले विचार मनात आणून फक्त मनस्ताप होईल. डोमिसाईल असणं जरुरी आहे. ते मिळवा. थोडा वेळ जाईल. रांगेत उभं राहावं लागेल. चालेल. पण डोमिसाईल हातात मिळवा. जन्माने महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा फायदा काहीजणांना होणार आहे. जर ते सीईटी देऊन प्रवेश घेणार असतील तर! हा संदेश आपल्या इतर प्रांतातील महाराष्ट्रीय बांधवांना पोहोचायला वेळ लागेल. म्हणजे काय फार मोठा परिणाम दिसणार नाही. अर्थात काही विद्यार्थ्यांचा हे डोमिसाईल न मिळाल्यामुळे जो तोटा झाला होता. निदान ते सगळे तरी वाचतील.
आता सर्वात प्रथम आपल्याला सांगायचं आहे की, १४ जून किंवा त्यापूर्वी ‘सीईटी’चा निकाल अपेक्षित आहे. याचा अर्थ लगेच १५ तारखेपासून प्रवेश अर्ज भरणे किंवा ऑप्शन्स देणे याला सुरुवात होईल असे नाही. खरं म्हणजे काहीच घडणार नाही. सुमारे १५ दिवसांचा वेळ मिळेल. त्यामध्ये फक्त आपल्या प्रमाणपत्रांची छाननी करून घ्यायची आहे. बाकी कॉलेजची निवड, ब्रँचची निवड वगैरे काहीही करावयाचे नाही. जे विद्यार्थी ‘एआयईईई’च्या मार्कावर प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना मात्र त्यासाठी एक अर्ज करावयाचा आहे.
या वर्षी नियमांत बहुधा काहीच बदल होणार नाही. याचं कारण अगदी सोपं आहे. इतकी वर्षे ही प्रवेशप्रक्रिया चालवून त्यातील सगळे दोष हळूहळू काढून टाकलेले आहेत. अगदी गेल्यावर्षी सीईटी आणि ‘एआयईईई’मधून प्रत्येक विद्यार्थ्यांला एकच अलॉटमेंट येईल. हा बदल तर सर्वात महत्त्वाचा होता. तर ही प्रवेशप्रक्रिया अतिशय चांगली आणि स्टेबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शी आहे. मुख्य म्हणजे विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून ही प्रक्रिया चालते. आपल्याला हेही लक्षात ठेवायला पाहिजे की, या प्रक्रियेमुळे प्रत्येकजण खूश होईल असे नाही, पण नियम जर नीट समजून घेतले आणि ऑप्शन्स जर नीट भरले तर मात्र आपल्याला आपल्या अपेक्षेच्या जवळ जाता येणं शक्य आहे.
या लेखातून आपल्याला हे नियम कसे समजावून देता येतील हाच आमचा प्रयत्न आहे. आपण निकालापासून सुरुवात करू. सी.ई.टी. परीक्षा २०० मार्काची असते. सुमारे दोन लाख विद्यार्थी ‘सीईटी’ला बसतात. म्हणजे एकेका मार्कावर १५० ते २०० विद्यार्थी असणार. अर्थात ही विभागणी काही समप्रमाणात असणार नाही. समजा १९९ मार्क मिळालेला एक विद्यार्थी असेल तर १९८ मार्क मिळवणारे दोन ते सहा विद्यार्थी असतील, तर १९७
वर हा आकडा मोठा होईल. १८० ते १९० मार्कावर सुमारे प्रत्येकी ४० ते ७० विद्यार्थी असतात, तर १७० ते १८० मध्ये हा आकडा आणखी वाढतो. यामुळे मार्कापेक्षा
आपला मेरिट क्रमांक महत्त्वाचा ठरतो. मग समान
मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळा मेरिट क्रमांक कसा मिळतो? हे पाहू.
सी.ई.टी.मध्ये समान मार्क असतील तर ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्समध्ये अधिक मार्क असतील त्याला वरचा मेरिट क्रमांक मिळेल. पण समजा मॅथ्समध्ये समान गुण असतील तर फिजिक्समध्ये ज्याला अधिक गुण असतील त्याला वरचा मेरिट क्रमांक मिळेल. यासंबंधीचे सगळे नियम आपल्याला मिळालेल्या पुस्तिकेत दिलेले आहेतच. त्यामुळे आपल्याला मिळालेला मेरिट क्रमांक सर्वात महत्त्वाचा आहे. अर्थात हा मेरिट क्रमांक आपल्याला निकालाबरोबर मिळेल असं नाही. तो कदाचित नंतर मिळू शकतो.
आजच्या या लेखाचे सर्वात महत्त्वाचे प्रयोजन आहे की, ‘सीईटी’ झाल्यापासून (६ मे पासून) निकालापर्यंत (सुमारे १४ जूनपर्यंत) विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणती माहिती गोळा करावी? यासाठीचे मार्गदर्शन.
माझा अनुभव असा आहे की, एकंदरीत संपूर्ण वर्ष खूप टेन्शनमध्ये घालवल्यावर विद्यार्थी आणि पालक अतिशय निवांत होतात. जणू काही एक शांत झोप घेतात आणि जागे होतात निकालाच्या
दिवशी. मान्य आहे की, खूप धावपळीत आणि टेन्शनमध्ये हे वर्ष गेलं. विश्रांती आवश्यक आहे.
पण ८-१० दिवस खूप झाले. उरलेल्या एक महिन्यात काय करावे? यासाठी हा लेख. सर्वप्रथम आपण ज्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितो त्या महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट द्यावी. क्लासरूम्स, लॅबोरेटरीज्, लायब्ररी, वर्कशॉप पाहून यावे. जमल्यास प्रोफेसर लोकांशी चर्चा करावी. जर होस्टेलमध्ये राहावयाचे
असेल तर तेही पाहून यावे. घरी राहून शिकणार असू तर
जायचा-यायचा वेळ, सोय इ. चा अभ्यास करून नोंद करून
ठेवावी. ऐकीव माहितीपेक्षा हे सर्व स्वत: पाहावे. यानंतर विद्यार्थ्यांची
ही माहिती पालकांनी पाहून चर्चा करावी. याच वेळेस महाविद्यालयाची फीज्ही विचारात घेतली जावी. पालकांनी त्यांच्या मित्रांकडून
आणखी माहिती गोळा करावी. कदाचित कमी मार्क पडले तर
दोन-तीन नवीन महाविद्यालयांनासुद्धा भेट द्यावी. याशिवाय अभियांत्रिकीमधील वेगवेगळ्या शाखा (ब्रँचेस) माहिती करून घ्याव्यात. पुढील शिक्षण अथवा करीअर या दृष्टीने स्कोप जाणून घ्यावा. पुढे
एम.बी.ए. करावयाचे असेल तर शाखा महत्त्वाची का महाविद्यालय, याचाही विचार करावा. आजचीच परिस्थिती चार वर्षांनी राहील का, हा विचार महत्त्वाचा ठरेल. चांगले महाविद्यालय म्हणजे काय, याचा मागोवा घ्यावा. हे सगळं अवघड आहे, पण अशक्य नाही. घरबसल्या नेटवर माहिती पाहून काम होणार नाही. पालकांचा कायमचा असा प्रयत्न असतो की, पाल्याला (विद्यार्थ्यांला) चांगली संधी द्यावी; परंतु विद्यार्थ्यांने हट्ट किती करावा? कोणता करावा? आणि पालकांनी कोणता हट्ट पुरवावा? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा महिना योग्य ठरेल.
..आणि जाता जाता एकच सांगतो, सर्वानाच इच्छा असते सीओईपी किंवा व्हीजेटीआय मिळावं अशी. पण ते शक्य नाही, हे मान्य करा.
चला तर मग, करू या सुरुवात? अभियंता तर व्हायचं आहेच
आपल्याला. त्यासाठी कष्टही हवेतच. स्वप्न पाहाणं सोपं आहे, प्रयत्नही केलाय; आता प्रत्यक्षात काय होणार याकडेच लक्ष ठेवू.
आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment